Talegaon : कसदार अभिनयाने अंजली कऱ्हाडकर यांनी उलगडली जननीची विविध भावरूपे  

एमपीसी न्यूज – आईची विविध रूपे आपल्या समर्थ अभिनयातून साकार करून कलापिनीच्या कलाकार अंजली कऱ्हाडकर यांनी तळेगावकर रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि आपली आई कै.डॉ.मंगला परांजपे यांच्या स्मृतिदिनी त्यांना आपल्या अभिनयाची सुमनांजली अर्पण केली.

वीज म्हणाली धरतीला, या नाटकातील झाशीची राणी, आरण्यकमधली गांधारी, हिमालयाची सावलीमधील बायो कर्वे, अखेरच्या सवालमधील अखेरच्या घटका मोजणाऱ्या कॅन्सरग्रस्त नंदूची आई, लेकुरे उदंड जाहली मधील मधुराणी, बहिणाबाईची माहेरवाशीण, सुधा मूर्तींच्या कथेतील शिक्षिका गौरम्मा, राजमाता जिजामाता अशा अनेक भूमिकांमधून आईची विविध रूपे दाखविणारा अंजली कऱ्हाडकर यांचा अभिनय थक्क करणारा होता. कायिक, वाचिक अभिनयाचे समर्थ दर्शन घडविणारी ही एक नाट्य कार्यशाळाच होती.

त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ३६ वर्षापूर्वी लेकुरे उदंड जाहली (हिंदी आणि मराठी), सूर्याची पिल्ले या नाटकांसाठी ३ रौप्य पदके मिळवली होती. त्यावेळेचा त्यांचा अभिनय आणि आणि या सादरीकरणातला अभिनय यात काहीच फरक नव्हता. आजही रौप्य पदकांच्या तोडीचाच होता. किंबहुना कांकणभर सरसच होता.

केवळ दीड तासाच्या अवधीत त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका, त्यांसाठी वापरलेली वेशभूषा, सर्व भूमिकांमधून वावरतानाचे चापल्य यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. “जननीची विविध रूपे मनाला खूप भावली. कधी आक्रमक, कधी प्रेमाचा झरा, कधी धीर देणारी, कधी अधीर, अवखळ मनातलं बालपण जपणारी, धाडसी आणि प्रेरणादायी जननी, खूप ऊर्जा देणारी. अभिनय, आवाजातील चढ-उतार बघून कधी डोळ्यांत पाणी आणणारे तर कधी हास्य उमटवणारे… असा अविस्मरणीय आणि रंगलेला कार्यक्रम रसिकांच्या मनात कायमच घर करून राहील यात शंकाच नाही

अंजली कऱ्हाडकर या सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाट्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  भारतात आणि परदेशात त्यांचे कार्यक्रम आणि कीर्तने झाली आहेत. कलापिनीतील बालनाट्य शिबिरांचा प्रारंभ त्यांनीच केला होता.

या सुंदर नाट्याविष्काराला तेवढीच तोलामोलाची साथ देणारे अरविंद परांजपे (तबला), आशुतोष परांजपे (संवादिनी),  शिवानी कऱ्हाडकर (पार्श्वसंगीत) आणि सीमा परांजपे (निवेदन) हे सर्व परांजपे कुटुंबीयच होते. ध्वनी संयोजन समर नंदेश्वर, प्रकाश योजना चेतन पंडित यांचा ही महत्त्वाचा सहभाग होता.

विश्वास देशपांडे (८३०८८३०४९४)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.