Talegaon: बोगस मिळकतदार अन्‌ बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची विक्री करणारा ‘ठग’ गजाआड

फसवणुकीचे आणखीन प्रकार उघडकीस येण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – बोगस मिळकतदार उभे करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखताद्वारे भूखंडाची विक्री करणा-या एका ठगाला त्याचा साथीदारासह तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून अशाप्रकारे फसवणूक केल्याचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी हवेलीच्या सहाय्यक निबंधक आणि पुण्यातील एका वकिलासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य सूत्रधार मोहन बबन दळवी (मोकाटेनगर, कोथरुड) आणि दत्तात्रय शंकर शिंदे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांचे साथीदार राजेंद्र रामचंद्र घारगे (रा. तळवडे), अभिजीत जीवन खिरीड (रा. कसबा पेठ,पुणे), अरुण पंडीत केरकर (रा. चंदननगर, खराडी,), भालचंद्र लक्ष्मण राईलकर, नारायण लक्ष्मण राईलकर (दोघे रा. वाघोली, पुणे), अॅड.मदन बी. श्रीश्रीमल (रा. पर्वती, पुणे), बाळासाहेब (पुर्ण नाव माहिती नाही) आणि एका अनोळखी महिला अशा 11 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हनुमंत सदाशिव शिंदे (वय 56 रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांची 68 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

  • फिर्यादी हनुमंत शिंदे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. आरोपी मोहन दळवी हा शिंदे यांचा चूलत साडू आहे. ऑगस्ट 2016 मध्ये आरोपी दळवी याने आपण तळेगाव दाभाडे येथे अनेकांना प्लॉट विक्री केली असून सर्वांची खरेदीखत झाली आहेत. त्यांची सिटी सर्व्हेला नावे लागलेली आहेत. तुम्ही तर नातेवाईक आहेत. तुम्हाला कमी किमतीत प्लॉट खरेदीकरुन देण्याचे आमिष शिंदे यांना दाखविले. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनीतील पाच गुट्यांचा 4 नंबरचा प्लॉट दाखविला. त्यावर शिंदे यांनी ही जागा कोणाच्या मालकीची असल्याबाबत विचारले असता सुहास प्रकाश देशपांडे यांची असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी वकिलांना दाखवितो, असे सांगिल्यानंतर दळवी यांनी दुसरा वकिल पाहण्याची आवश्यकता नसल्याचे शिंदे यांना सांगितले. या व्यवहारात बोगस माणसे असल्याचा शिंदे यांना संशय आला.

काही दिवसांनी दळवी याने शिंदे यांना सात लाखाचा धनादेश परत केला. त्यावेळी त्यांना याप्रकरणात दाट संशय आला. भंडारा दर्शन कॉलनीमधील प्लॉट नं.5 आणि यशवंतनगर येथील प्लॉट नंबर 180 मधील प्रत्येकी चार गुंठ्याचे दोन भूखंड सुहास प्रकाश देशपांडे, श्रीराम शंकर वझे या व्यक्ती अस्तित्वात नसतानाही त्यांच्या जागी बनावट नावे धारण करुन, बोगस ओळखपत्रे दाखवून बनावट खरेदीखत आणि दस्तावेज नोंदनीद्वारे फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

  • त्यानंतर शिंदे यांनी मोहन दळवी यांच्याकडे वेळोवेळी पैसे परत देण्याची मागणी केली. मी पैसे देत नाही. काय करायचे ते कर, पोलीस केस कर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाठी केली. त्यानंतर शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संगनमताने बोगस मिळकतदार उभे करुन बनावट कागदपत्र आणि खरेदीखताद्वारे भूखंडाची परस्पर विक्री करुन 68 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी हवेलीच्या सहाय्यक निबंधक आणि पुण्यातील एका वकीलासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यात जमिनीचे बोगस व्यवहारांचे पेव फुटले आहे. उघडकीस आलेल्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहन दळवी आणि दत्तात्रय शंकर शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दळवी याच्याकडून अशा प्रकारे फसवणूक केल्याचे आणखीन प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.