Talegaon : पुणे-मुंबई महामार्गावर हायवा पलटी; एकाचा जागीच मृत्यू (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर हायवा (डंपर) पलटी झाला. पलटी झालेल्या डंपरखाली चिरडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात बाजूला फेकला गेल्याने तो बचावला आहे. हा अपघात आज, सोमवारी (दि. 3) सायंकाळी लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे झाला.

प्रसाद बारगड (वय 24, रा. तळेगाव, मूळ रा. वांबोरी, अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन शांताराम माने (वय 28, रा. वराळे, ता. मावळ) असे दुचाकीवरील जखमी तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो आंबी येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. प्रसाद आणि नितीन सोमवारी दुपारी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आले होते. तिथून ते दुचाकीवरून तळेगावकडे जात होते. तळेगाव बाजूकडून देहूरोड बाजूकडे जात असलेल्या हायवाची (एम एच 14 / जी यू 8802) लिंब फाटा येथे विरुद्ध बाजूने येत असलेल्या दुचाकीस जोरात धडक बसली. या अपघातात क्रसॅण्डने भरलेला हायवा रस्त्यावर पलटी झाला.

दुचाकी चालक प्रसाद दुचाकीसह हायवाखाली सापडला. त्यात तो जागीच ठार झाला. क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने हायवा बाजूला केल्यानंतर प्रसादचा अडकलेला मृतदेह बाजूला काढण्यात आला. दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र बाजूला फेकला गेल्याने सुदैवाने बचावला. त्याच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. हायवा पलटी झाल्याने हायवा चालक जखमी झाला आहे. त्याला सोमटणे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर प्रसादचा मृतदेह नेतेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. दरम्यान, काही वेळ मुंबई-पुणे मार्गावर काही अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून हायवा रस्त्याच्या बाजूला केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like