Talegaon : एलपीजी गॅस पाईपलाईनमधून गॅस चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – एलपीजी गॅस पाईपलाईनमधून गॅस चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील एका शेतात हा प्रकार शुक्रवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आला.

नितीन दयाराम दलाल (वय 47, रा. रहाटणी, पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण ते चाकण शिक्रापूर या दरम्यान भारत सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या मालकीची एलपीजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईप लाईन नवलाख उंब्रे येथून गेली आहे. अज्ञातांनी नवलाख उंब्रे येथील एका शेतात गॅस पाईप लाईन पासून एक ते दीड मीटर अंतरावर खड्डा खोदून तिथून एलपीजी गॅस चोरण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत अज्ञातांवर भारतीय दंड विधान कलम 379, 511 यासह पेट्रोलियम खनिज पाईप लाईन अधिनियम 1962 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.