Talegaon : सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन गटात राडा; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज  – व्हॉट्सअपवर टाकलेल्या वर्चस्वाच्या पोस्टवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तीन कारची तोडफोड करण्यात आली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 11) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे शुभम कॉम्प्लेक्स जवळ घडली.

योगेश गायकवाड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर तळेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कांब्रे कामशेत येथील देवा गायकवाड आणि हरण्येश्वरवाडी, तळेगाव स्टेशन येथील सांडभोर या दोन गटात दुपारी दोनच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. व्हॉट्सअपवर वर्चस्वाच्या पोस्ट वरून सुरुवातीला वाद झाला. सांडभोर गटाने गायकवाड गटाला तळेगाव स्टेशन येथे बोलावून घेतले. गायकवाड गट तळेगाव स्टेशन येथे आला असता दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी शस्त्र काढल्याची देखील माहिती मिळत आहे.

घटना घडल्यानंतर तळेगावच्या माजी नगराध्यक्षांनी तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यास दूरध्वनी केला. मात्र, पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनी (मोबाईल)वर संपर्क केला. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, वाद विकोपाला जाऊन गंभीर हाणामारी झाली. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. या वादामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.