Talegaon : मावळात आज पुन्हा दोघे  कोरोना पॉझिटिव्ह; एकूण सक्रिय रुग्ण संख्या 33

Both corona positive again in Maval today; Total active patient number 33

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील खळदे आळी येथे राहणारा 18 वर्षीय भाजी विक्रेता व वराळे, मावळ येथे राहणारा चिंचवड येथील राका गॅस एजन्सीमध्ये काम करणारा 46 वर्षीय कामगार अशा दोघांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (गुरूवारी) पॉझिटीव्ह आला.

त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 68 इतकी झाली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून 33 कोरोनामुक्तांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मावळ तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 33 आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

वराळे मावळ येथे राहणारा 46 वर्षीय कामगार चिंचवड येथील गॅस एजन्सीमध्ये कामाला जात होता. तर तळेगाव दाभाडे येथील 18 वर्षीय तरूण भाजी विक्रिचा व्यवसाय करत आहे.

या दोन्ही व्यक्तींना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने ते बुधवारी (दि 24) तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आले होते. त्या दोघांचाही स्वॅब घेण्यात आला होता. आज, गुरूवारी या दोघांचाही कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

त्यांना तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेंटर दाखल करण्यात आले आहे. वराळे येथील 46 वर्षीय व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 4 जणांचे व भाजी विक्रेत्याच्या संपर्कातील 5 जणांचे तळेगाव सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे यांनी सांगितले.

मावळात आजपर्यंत एकूण 68 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 24 जण शहरी भागातील, तर 44 जण ग्रामीण भागातील आहेत. त्यापैकी 33 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली आहे.

तालुक्यातील एकूण 33 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर आतापर्यंत तालुक्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.