Talegaon: ब्रिजेंद्र किल्लावाला यांचे प्रशिक्षित मावळे कोरोना गडावर; पोलिसांच्या मदतीला तरुणाई!

स्वराज्य मित्र मंडळाचे वीर दौडले एकसाथ! 

एमपीसी न्यूज – वीर दौडले सात? ….नाही नाही एकसाथ! तेही तब्बल 35 जण. कडोलकर कॉलनीतील 22 आणि स्टेशन विभागातील काही युवकांचा त्यात समावेश आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्यांच्यावर पोलीस मित्राची जबाबदारी टाकण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य मित्रमंडळाचे प्रणेते ब्रिजेंद्र किल्लावाला यांनी ही संकल्पना साकारली असून त्यामुळे गेले 40 दिवस कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत आहे.

याबाबत किल्लावाला यांनी सांगितले की, स्वराज्य मित्र मंडळाच्या 22 कार्यकर्त्यांना सामाजिक वर्तणुकीचे भान राखण्याचे आणि कोरोना संक्रमणाच्या शक्यता पाहता नागरिकांशी बोलताना घ्यावयाची काळजी याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन देखील त्याकामी महत्वाचे ठरले आहे.

या पोलीस मित्रांना पुढील बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  भाज्या, फळे, दुध या नाशवंत मालाच्या तसेच शेती अवजारे, खते यांच्या वाहनांना आडवू नये. परंतु सदर वाहनात दोनहून अधिक लोक असतील तर त्यांची चौकशी करावी. ओळखपत्रातील पत्ता पहावा. संशयीत असतील व रेड झोन मधून आले असतील तर सोबतच्या पोलिसांना सांगावे. भाजीपाला, किराणामाल घेण्यासाठी तळेगावातील रहिवासी असतील तर ओळखपत्रात पत्ता पाहून सोडावे. उर्से, शिरगाव, सोमाटणे येथील लोकाना फक्त मेडिकल व शेतीसाहित्य, गॅस या कारणासाठीच सोडावे. भाजी , किराणासाठी त्यांचे गावातूनच घेण्यास परत पाठवावे. पुणे, पिंपरी या ठिकाणाहून ये-जा करणारे आढळल्यास सोबतच्या पोलिसांना सुचित करावे.

नम्रपणे बोलावे व संघर्ष टाळावा

कोणाचेही ओळखपत्र व पास हातात न घेता त्याला लांबूनच दाखवण्यास सांगावे. गाडी व व्यक्तीस स्पर्श करु नका. समोरच्याने मास्क घातला नसल्यास अथवा तोंडाखाली ओढला असल्यास प्रथम लांबूनच मास्क घालण्यास सांगावे. सोबत सॅनिटायझर ठेवावे स्वतः बोलताना मास्क लावूनच बोलावे. कॅप वापरावी. घरी गेल्यावर कोठेही हात न लावता कपडे टेरेसवर अथवा बाजूला ठेऊन द्यावेत. ते दुसर्‍या दिवशीपर्यंत निर्जंतुक होतात. हातपाय साबणाने स्वच्छ धुवून घरचे कपडे घालावेत आणि त्यानंतरच घरात वावर करावा.

 पोलीस मित्र समन्वय समितीचे सदस्य समाजसेवक दिलीप डोळस, नितीन खळदे, आणि महेश महाजन यांनी याकामी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाल्याचे ब्रिजेंद्र किल्लावाला यांनी सांगितले. स्टेशन भागातील 13 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्टेशन चौक, सिंडिकेट बँकेजवळील मराठा क्रांती चौक आणि अन्य ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तासाठी त्यांचे पोलीस मित्र 24×7 तैनात केले आहेत.

विनाकारण भटकणाऱ्यांवर कारवाई करणार – अमरनाथ वाघमोडे
तळेगाव स्टेशन येथील मराठा क्रांती चौकात वाहन व नागरिकांची कडक तपासणी होत असल्याने स्टेशन भागात मोकाट फिरणा-यांचा वावर कमी झालेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे इतर सर्व ठिकाणी असेच चित्र दिसत आहे. यापुढे लाॅकडाऊन असेपर्यंत दुपारी एक नंतर विनाकारण बाहेर फिरणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.