Talegaon : वाढीव रकमेची वीज बिले रद्द करा; अन्यथा आंदोलन- वैशाली दाभाडे

वाढीव रकमेची वीज बिले रद्द करा; अन्यथा आंदोलन- वैशाली दाभाडे-Cancel excess electricity bills; Otherwise movement- Vaishali Dabhade

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे शहरातील घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मीटर रिडिंग न घेता तीन महिन्यांनी अवाजवी बीले आकारण्यात आलेली आहेत. ही वाढीव बिले रद्द करून फेरआकारणी करून नवीन वीज बीले द्यावी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वीज वितरण मंडळाचे उपअभियंता राजेंद्र गोरे यांच्याकडे तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

उपनगराध्यक्षा दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमएसइबीने एप्रिल ते जून तीन महिने रिडींग न घेता प्रचंड बीले आकारण्यात आलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यात लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत दरमहा वीज बील रिडिंग न घेता एकदम जून महिन्यामध्ये ग्राहकांना वीज बील पाठविले, त्यामुळे ग्राहकांवर वीज बिलाचा मोठा बोजा पडला आहे.

संबंधित बिलाची फेरआकारणी करून ग्राहकांना नवीन वीज बील देण्यात यावे. तोपर्यंत याआधी दिलेली वाढीव वीज बिले भरणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे घरातील आर्थिक बजेट कोलमडलेले असताना वाढीव वीज बिलांची त्यात भर पडलेली आहे. त्यामुळे वीज बिलाची फेरआकारणी करून नवीन बीले पाठवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याप्रसंगी नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर उपाध्यक्षा ज्योती शिंदे, युवती शहराध्यक्षा निशा पवार, युवती उपाध्यक्षा शिवानी सोनावणे, कार्याध्यक्षा रूपाली विनोद दाभाडे आदी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like