ऋणानुबंधाचे नाते, तळेगावकर आणि नटसम्राट डॉ.श्रीराम लागू यांचे 

डॉ. श्रीराम लागू हे कलाकार म्हणून किती श्रेष्ठ होते, हे आपण सर्वांनी रंगमंचावर आणि रुपेरी पडद्यावर पाहिले आहेच पण माणूस म्हणून ते किती मोठे होते, याचा अनुभव तळेगावकरांनी, येथील कलाकारांनी, रसिकांनी अनेकदा घेतला आहे.

अप्पा दांडेकरांच्या ‘जगन्नाथाचा रथ’ या पी.डी.ए.च्या नाटकात १९५७ मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यावेळी ते दिग्दर्शक भालबा केळकर यांच्याबरोबर अनेक वेळा चर्चेसाठी तळेगावला अप्पांकडे आले होते. १९६१ साली तळेगावच्या हौशी नाट्यमंडळाने कै.डॉ.शं.वा.परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर केलेल्या ‘वेडयाचे घर उन्हात’ या नाटकाच्या प्रयोगाला भालबा केळकर आणि डॉ.श्रीराम लागू आले होते, अशी आठवण सांगितली जाते.

स्वत: खूप मोठे असलेले डॉक्टर लहान कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी कायमच तयार असत. कलापिनीने अतुल कुलकर्णी, प्रसाद वनारसे व संजना कपूर (कै. शशी कपूर यांची कन्या) यांच्यासह रंगवर्धन महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी एक दिवस डॉ.लागू पूर्ण वेळ उपस्थित होते त्या दिवशी विद्या अंबिके आणि त्यांच्या ओजस्विनी भाव, भक्ती गीतमंडळाच्या सहकाऱ्यांनी स्वयंपाकघरातील खलबत्ता, भांडी, कढया, पातेली यांचा वापर करून किचन वाद्यवृंद सादर केला होता, त्याचे त्यांनी कौतुक केले होते. कलाकारांशी संवादही साधला होता.

“हिमालयाची सावली” हा रंगभूषा, वेशभूषा, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनेचा वापर करून नाट्यात्म अभिवाचनाद्वारा नाटक रसिकांपर्यंत पोहोचविणारा अभिनव उपक्रम. रंगवर्धनच्या वतीने पुणे, दौंड, सोलापूर, पृथ्वी थिएटर, मुंबई या ठिकाणी तर प्रयोग झालेच पण बडोदा, कर्वे स्त्री शिक्षण संस्था भवन मुंबई येथेही या प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळाला. या नाट्यवाचनाच्या रौप्य महोत्सवी प्रयोगाला डॉ.लागू भरत नाट्यमंदिर, पुणे येथे आवर्जून पूर्ण वेळ उपस्थित राहिले. अभिवाचनाद्वारे नाटक पोहोचविण्याच्या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. कारण वाचिक अभिनय हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. प्रो. भानूंची भूमिका करणारे बाळासाहेब गद्रे आणि बयोची भूमिका करणाऱ्या अंजली कऱ्हाडकर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले व इतर कलाकारांची जाणीवपूर्वक दाखल घेतली.

कलापिनीने २००५ साली सोफोक्लीसचे ग्रीक नाटक “ओडिपस अॅट कोलोनस”चा भारतीय भाषेमधील पहिलाच प्रयोग “बहिष्कृत ओडिपस” महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केला. या नाटकाला पुणे केंद्रावर प्रथम पारितोषिक मिळाले. या नाटकाचे लेखक व प्रमुख भूमिका करणारे विद्याधर दाते आणि दिग्दर्शक मीनल कुलकर्णी यांची व नाटकातील कलाकारांची डॉ.लागूंनी प्रयोगाला पूर्णवेळ उपस्थित राहून केलेली प्रशंसा कलाकारांना मोठे बळ देऊन गेली. नवीन प्रयोगाची दखल घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य डॉ. लागूंनी आयुष्यभर केले. याच नाटकाच्या पुस्तक प्रकाशन समारंभालाही ते आवर्जून उपस्थित होते.

कलापिनीने शब्दोत्सव या उपक्रमात “लमाण” या त्यांच्या आत्मचरित्रावर परिसंवाद घडवून आणला. ”लमाण”ने मला काय दिले, या विषयावर व त्यातील नाट्य, चित्रपट, सामाजिक चळवळ, कलाकारांना मार्गदर्शन या विषयावर मीनल कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, डॉ. सुहास कानिटकर असे वक्ते बोलल्यानंतर डॉ.लागूंची प्रदीर्घ प्रकट मुलाखत झाली. कलाकारांना वाट दाखविणारा दीपस्तंभच जणू. अॅन अॅक्टर इज अॅथलेट फिलोसॉफर. अँड यू आर ए इंन्स्ट्रूमेंट अँड यू आर द प्लेअर, हा डॉक्टरांनी कलाकारांना दिलेला संदेश कायम स्मरणात ठेवावा आणि आचरणात आणावा असाच आहे.

कलापिनीच्या रंगवर्धन या केवळ प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणाच्या उपक्रमात अतुल पेठे यांचे “सूर्य पाहिलेला माणूस” हा नाट्यप्रयोग सादर झाला. हा प्रयोग म्हणजे तळेगावकर रसिकांसाठी तत्त्वज्ञान, अभिनय सादरीकरण यांची पर्वणीच ठरला. सॉक्रेटीसची तत्त्वनिष्ठा, तत्त्वज्ञान व शांतपणे स्वीकारलेला मृत्यू हे सर्व पैलू डॉ.लागूंनी आपल्या समर्थ अभिनयातून सादर केले, त्याचे वर्णन केवळ “अविस्मरणीय” याच शब्दात करता येईल. विशेषतः विष घेतल्यावर विषाचा अंमल हळूहळू वाढत जाताना जो अभिनय केला, त्याला तोडच नाही.

यशवंत नगरमधील यशोधाम हॉलमधील या प्रयोगाला अवघे १५० ते २०० प्रेक्षक असतील पण हिंदी, मराठी नाट्य आणि सिनेक्षेत्राच्या कळसावर असलेले डॉ. लागू लहान गावातील छोट्याशा हॉलमधील मोजक्या रसिकांसमोर ज्या उत्कटतेने व प्रामाणिकपणे सादरीकरण करीत होते, ते आज जास्त अनुकरणीय आहे….कलाकाराची शिस्त त्यांनी आपल्या कृतीतून दाखविली. सगळ्यांच्या आधी स्वतःच्या गाडीतून आले आणि मोठेपणाचा बडेजाव न दाखविता एका खुर्चीवर शांतपणे बसून राहिले, असे कितीतरी पैलू अशा थोर कलाकराच्या सहवासात तळेगावकरांना वेळोवेळी लाभत गेले आणि या सुवर्ण क्षणांमुळे तळेगावच्या कलाकारांचे आणि रसिकांचेही आयुष्य उजळून निघाले आणि संपन्नही झाले.

तळेगावकर रसिक आणि कलापिनी परिवाराच्या वतीने या थोर कलाकारास विनम्र आदरांजली…

– विश्वास देशपांडे

८३०८८३०४९४

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like