Talegaon Dabhade : व्हॉट्सअ‍ॅपवरील अश्लील मेसेजला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर येणा-या अश्लील मेसेजला कंटाळून प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 8) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर घडला.

तानाजी शाहू सोनवणे (वय 29, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा. तांबेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत रंगनाथ जाधवर (वय 41, रा. भूम, जिल्हा, उस्मानाबाद)यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोनवणे हे मावळ, आंबी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. 27 डिसेंबर 2018 पासून आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन सोनवणे यांना व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शिवीगाळ केली जात होती. मेसेज आणि कॉल करुन वारंवार त्रास दिला जात होता.

याबाबत सोनवणे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात 27 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. तरी देखील मेसेज येतच होते. त्याला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.