_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Corona News : वराळेच्या श्री हॉस्पिटलकडून माणुसकीचे दर्शन ! कोरोनाबाधित अनाथ महिलेवर मोफत उपचार

एमपीसीन्यूज : निराधार असलेल्या कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेवर वराळे ( ता. मावळ) हद्दीतील श्री हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात आले. श्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून निराधार महिलेबाबत दाखविलेल्या या माणूसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अंजना भगवान शिंदे (वय ५४, रा. वैराग -बार्शी, जि. सोलापूर) असे या निराधार महिलेचे नाव आहे. त्यांचे पती व मुलांचा मृत्यू झाल्यापासून त्या तळेगाव दाभाडे येथील वानप्रस्थाश्रमात वास्तव्य करत आहेत.

रविवारी (दि.९) त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह झाला. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यात त्या अनाथ असल्याने त्यांच्यावर लाखोंचा खर्च कोण करणार ?, असा प्रश्न समोर असताना आरोग्य सहाय्यक दीपक ढवळे यांनी श्री हॉस्पिटलचे डॉ. विशाल कुकडे व डॉ. विशाल पाटील यांना या अनाथ महिलेच्या मोफत उपचाराबाबत विचारले.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर श्री हॉस्पिटलकडून काय उत्तर येते याची प्रतीक्षा असताना डॉ. विशाल कुकडे व डॉ. विशाल पाटील यांनी त्वरित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. यावर दीपक ढवळे यांचा क्षणभर विश्वास बसला नाही.

श्री हॉस्पिटलमध्ये अंजना शिंदे या अनाथ महिलेला तात्काळ दाखल करून घेण्यात आले. तसेच त्यांना ऑक्सिजन व अनेक महागडे औषधोपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिंदे यांना कालच (दि 14) डिस्चार्ज मिळाला. कोरोनाच्या आजारावर वेळीच मोफत उपचार झाल्याने श्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांमध्ये माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील अमानवी घटना समोर येत असताना वराळे येथील श्री हॉस्पिटलमध्ये अनाथ महिलेला मोफत उपचार मिळाल्याने डॉ. विशाल कुकडे व डॉ. विशाल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 डॉ. विशाल कुकडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनाथ महिलेला पैसे नसल्याने उपचार न देणे हे मनाला अस्वस्थ वाटले. आपली सामाजिक बांधिलकी ओळखून त्या महिलेला पूर्ण मोफत औषध उपचार देऊन बरं केल्याचा आनंद वाटत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.