Talegaon Corona Update: कोरोना रुग्णाची खबर… दिवसभराची शोध मोहीम आणि न सापडलेला पत्ता!

Talegaon Corona Update: All day long 'search' to find the home of 'that' Corona positive patient

एमपीसी न्यूज –  ससून रूग्णालयात आढळलेल्या एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाने दोन वेगवेगळे पत्ते सांगितल्यामुळे रुग्णाचे नेमके घर शोधण्यासाठी आज दिवसभर तळेगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. एवढी शोधाशोध करूनही शेवटी त्या रुग्णाचे घर सापडलेच नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात आज दिवसभर तो चर्चेचा विषय ठरला.

एका अपघातात जखमी झालेला रुग्ण ससून रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी अन्य तपासण्यांबरोबरच त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि प्रशासनाची सूत्रे जोरात हालवली जाऊ लागली. त्या रुग्णाने तळेगाव आणि सोलापूर येथील दोन वेगवेगळे पत्ते सांगितल्याने गोंधळात भर पडला.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तळेगावमधील यशवंतनगर भागात राहणारा एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती तळेगाव नगर परिषदेस कळविण्यात आली. कोरोना संशयित रुग्ण असला तरी सध्या सर्वांची एकच धांदल उडते. या ठिकाणी तर पॉझिटीव्ह पेशंटचे घर हुडकायचे असल्याने नगर परिषद प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी संपूर्ण यशवंतनगर परिसर पिंजून काढला. घराघरात चौकशी केली, मात्र काही केल्या त्या रुग्णाचे घर शेवटपर्यंत सापडले नाही.

तळेगावात याबाबत सर्वांनी कसून शोध घेऊन ती व्यक्ती सापडली नसल्याचा अहवाल तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे.

संबंधित कोरोना रुग्ण यशवंतनगरमध्ये असल्याची जोरदार अफवा  दुपारी पसरली आणि  एकच धावपळ झाली आणि शोधा शोध सुरू झाली. स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक निखिल भगत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा शोध मोहिमेवर निघाला. दरम्यान मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ प्रवीण कानडे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि प्रशासन आदींनी जंग जंग पछाडलं परंतु चुकीच्या पत्त्यामुळे त्या नावाची वा त्या पत्त्यावरील व्यक्तीचा तपास लागला नाही.

‘ससून रुग्णालयाकडून मागवली रुग्णाची सविस्तर माहिती’

नगरपरिषद प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आदींनी सखोल चौकशी प्रभागात केली असता, त्या नावाच्या व्यक्तीचे घर शहरात ‘यशवंतनगर, तळेगाव’ या नमूद केलेल्या पत्त्यावर कोठेही आढळून आले नाही. याबाबत ससून हाॅस्पिटल प्रशासनाकडे सविस्तर माहिती मागितलेली आहे. सदर माहिती प्राप्त झाली तर सदर व्यक्ती शहरातील रहिवासी आहे किंवा नाही याबाबत तळेगाव शहरात असेल तर त्यांचा पत्ता कळवावा म्हणजे त्याबाबत योग्य ती कार्यवाही करता येईल.

 – दीपक झिंजाड, मुख्याधिकारी,  तळेगाव दाभाडे, नगरपरिषद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.