Maval Corona Update : कडधेत एकाला कोरोनाची लागण; मावळात सक्रिय रुग्णसंख्या तीन

Coronavirus infection in one person at kadadhe ; Three active patients in Maval

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सात दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (सोमवारी) पवन मावळातील कडधे येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. सध्या मावळ तालुक्यामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या तीन आहे.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला मधुमेह असल्याने ते चिंचवड येथील बिरला हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांची चाचणी करण्यात आली असता चाचणी अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील सरपंच महिलेसह सहा जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, कडधे गावाचा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. करूंज, आर्डव व येळसे ही तीन गावे बफर झोनमध्ये आहेत,असे मावळ- मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेशात नमूद केले आहे.

मावळ तालुक्यातील आतापर्यंत 17 रूग्णांपैकी 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कामशेत व टाकवे बुद्रुक येथील दोन नऊ महिन्यांची बालके व आजचा 48 वर्षीय व्यक्तीसह तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लोहारे व गटविकासाधिकारी शरदचंद्र माळी यांनी दिली.

गेल्या सात दिवसात मावळ तालुक्यात कोरोनाची साखळी तुटली होती. या परिस्थितीत रूग्ण बरे होण्याचा दर चांगला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी असे तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.