Talegaon Crime : खून करून पळून जाणा-या आरोपींचा 175 किलोमीटर पाठलाग करून आवळल्या मुसक्या

गुन्हे शाखा युनिट पाच, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी परिसरातील इंदोरी येथे तिघांनी धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून केला. खून करून तिन्ही आरोपी लपून राहण्यासाठी नाशिक जिल्ह्यात मित्राकडे जात होते. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाच आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या आरोपींना अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींचा तब्बल 175 किलोमीटर पाठलाग केला.

देवेंद्र नाना जाधव (वय 23), मयुर उर्फ नच्या अभिमान शिंदे (वय 21), शुभम संजय भापकर (वय 21, तिघे रा. इंदोरी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुरुदास उर्फ पिल्या सदाशिव तेलंग (वय 27, रा. इंदोरी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गुरुदासचा भाऊ अमर सदाशिव तेलंग याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिन्ही आरोपी हे मयत गुरुदास याचे मित्र आहेत. देवेंद्र आणि गुरुदास यांचे वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग देवेंद्र याच्या मनात होता. गुरुवारी (दि. 5) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास गुरुदास इंदोरी येथील कॅडबरी कंपनीच्या समोर कच्च्या रस्त्याने दुचाकीवरून जात होता. तिन्ही मित्रांनी गुरुदासवर धारदार शस्त्राने हल्ला केला. चेह-यावर, गळ्यावर गंभीर जखमा करून गुरुदासचा खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून करून आरोपी नाशिककडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाच यांची दोन पथके तत्काळ आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली.

आरोपी दुचाकीवरून नाशिककडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींचा तब्बल 175 किलोमीटर पाठलाग केला. आठ तासात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी खून करून लपण्यासाठी नाशिक येथील मित्राकडे जात असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ दोन) आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (देहुरोड विभाग) संजय नाईक-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, राजेंद्र साळुंके, धनराज किरनाळे, श्यामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, नागेश माळी, मयुर वाडकर, प्रशांत सोरटे, अशोक आंबेकर, नंदकुमार चव्हाण, शंकर चिंचकर, नितीन तारडे, राजेंद्र शेटे, संदिप ठाकरे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, गणेश मालुसरे, फारुक मुल्ला, भरत माने, राजकुमार इघारे, नितीन बहिरट, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.