Talegaon Crime : 50 लाखांची अवैध दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातून पळवली

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावून कारवाई करत पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकला अडवले. ट्रकमधून 50 लाखांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेली दारू आणि कंटेनर सात जणांनी मिळून उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातून पळवून नेला आहे.

ही घटना गुरुवारी (दि. 1) पहाटे पावणे एक वाजता तळेगाव चाकण रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घडली.

दुय्यम निरीक्षक योगेश नानाभाऊ फटांगरे यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर नंबर एम एच 20 / डी ई 0207 मधील दोन इसम, होंडा सिटी कार नंबर एम एच 12 / डी एम 2020 मधील तीन अनोळखी इसम आणि सेन्ट्रो कार नंबर एम एच 12 / सी डी 2713 मधील दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला 29 सप्टेंबर रोजी माहिती मिळाली होती की, गोवा राज्यात तयार केलेली आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेली उत्पादन शुल्क व अन्य कर चुकवलेली अवैध दारू पुण्याकडून मुंबईकडे वाहून नेली जाणार आहे.

त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाट्याजवळ शंकरवाडी येथे सापळा लावला. उत्पादन शुल्क विभागाने एक कंटेनर ताब्यात घेतला. अवैध दारुसह कंटेनर तळेगाव चाकण रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणले. 1 ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे एक वाजता आरोपी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकाला दमदाटी केली. शिवीगाळ आणि झटापट करून 50 लाखांची अवैध दारू आणि 20 लाखांचा कंटेनर जबरदस्तीने पळवून नेला आहे.

याबाबत सात जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 395, 353, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.