Talegaon Crime News : ब्लॅकमेलिंग करून तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अटकपूर्व जामिनावर मोकाट

पीडित कुटुंबाला वारंवार धमकी; आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची उदासीनता

एमपीसी न्यूज : क्लासमध्ये असताना तरुणीशी मैत्री करुन तिच्यासोबतचे फोटो आणि चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले. त्यानंतरही आरोपींच्या वाढत्या मागण्यांना कंटाळून तरुणीने स्वतःचे आयुष्य संपवले.

याबाबत एका महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्ह्यातील आरोपी अटकपूर्व जामिनावर समाजात मोकाट फिरत आहे. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबाला वारंवार धमकी देत आहे. याबाबत तक्रार करुनही पोलीस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशी माहिती मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत दिली.

याशिका दीपक ओसवाल (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत दीपक प्रकाशचंद ओसवाल यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विक्रांत पाटील (रा. वतननगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत याशिका ही तळेगाव दाभाडे येथे क्लासला जात असताना तिची आणि आरोपी विक्रांतची ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन विक्रांत याने याशिका सोबत फोटो काढले तसेच चॅटिंग केले. त्याने काढलेले फोटो आणि केलेले चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन विक्रांत, त्याचा मित्र गायकवाड, स्वप्नील धायबर आणि सोनाली हैद्र यांनी याशिकाकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळले.

याशिकाने पैसे देऊनही आरोपींची मागणी थांबली नाही. त्यांच्या त्रासाला कंटाळून याशिकाने 23 जानेवारी 2021 रोजी राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली.

याबाबत पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारल्यानंतर तसेच अनेक विनंत्या केल्यानंतर 19 फेब्रुवारी 2021 रोजी तळेगाव दाभाडे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (भारतीय दंड विधान कलम 306, 504) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात केवळ विक्रांत यालाच आरोपी करण्यात आले. त्याच्या अन्य साथीदारांची नावे पोलिसांनी वगळली. मुलीच्या आत्महत्येसाठी विक्रांत प्रमाणेच अन्य तिघेही तितकेच जबाबदार असल्याचे सांगून देखील तळेगाव दाभाडे पोलिसांनी सहकार्य केले नाही.

दरम्यान आरोपी विक्रांत याने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनसुद्धा तो समाजात मोकाट फिरत आहे. आरोपी विक्रांत हा गुंड प्रवृत्तीचा असून तो आता फिर्यादी यांच्या कुटुंबाला धमकावत आहे. त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहे. त्यामुळे विक्रांत पाटील याचा मंजूर झालेला जामीन तात्काळ रद्द व्हावा. त्याला अटक व्हावी. त्याच्या अन्य साथीदारांना देखील आरोपी करावे. आरोपींवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी मृत मुलीच्या पालकांनी केली आहे.

याबाबत याशिकाच्या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देखील पीडित कुटुंबाने निवेदन दिले आहे. प्रवीण दरेकर यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना याबाबत पत्र लिहिले आहे. अर्जदारास योग्य तो न्याय मिळण्याची मागणी दरेकर यांनी गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.