Talegaon crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टेम्पो-ट्रक अपघातात क्लीनर ठार

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आयशर टेम्पोला एका ट्रकने धडक दिली. यामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टेम्पोमध्ये मागे झोपलेल्या क्लीनरचा या अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे तीन वाजता परंदवडी ब्रिजजवळ घडली.

रामधीरज मौर्य (वय 42) असे मृत्यू झालेल्या क्लीनरचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र हरी सिंग (वय 53, रा. मुंबई) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग हे त्यांच्या आयशर टेम्पोमध्ये (एमएच 05 / डीके 2993) हिंजवडी येथून माल भरण्याकरता भांडूप येथून येत होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर परंदवडी ब्रिजजवळ एका अज्ञात ट्रकने सिंग यांच्या आयशर टेम्पोला डाव्या बाजूने धडक दिली. यामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टेम्पोमध्ये मागे क्लीनर रामधीरज मौर्य झोपले होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी (दि. 14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.