Talegaon Crime News : एकाच जमिनीची दोन वेळा विक्री; दहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – एक जमीन प्रथम एकाला विकली. ज्यांना जमीन विकली त्याची परवानगी न घेता त्याच जमिनीची पुन्हा विक्री केली. याप्रकरणी दहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 सप्टेंबर 2008 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

लक्ष्मीबाई बबन मोरे (वय 60), राजू बबन मोरे (वय 45), लक्ष्मण हरिभाऊ मोरे (वय 60, तिघे रा. काले पवनानगर, ता. मावळ), बायडाबाई दत्ता कदम (वय 45, रा. गोडुंब्रे, ता. मावळ), सीताबाई दगडू लोहकरे (वय 50, तुंग, ता. मावळ), सीताबाई रामदास मोरे (वय 50, रा. तुंग, ता. मावळ), भाऊ रामदास मोरे (वय 38, रा. कामशेत, ता. मावळ), सोनू उर्फ सुभाष रामदास मोरे (वय 35, रा. काले पवनानगर, ता. मावळ), पप्पू उर्फ पदू उर्फ अतुल रामदास मोरे (वय 32, रा. काले पवनानगर, ता. मावळ), भरत हरिभाऊ मोरे – सुतार (वय 54, रा. काले पवनानगर, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सुरेंद्रा कन्हैयालाल शर्मा (वय 46, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या नावावर असलेली दोन हजार 520 चौरस फूट जमीन सन 2008 साली फिर्यादी शर्मा यांना विकली.

त्याचे कुलमुखत्यारपत्र व साठेखत देखील करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी शर्मा यांना विश्वासात न घेता तीच जमीन सुप्रिया पांढरमिसे आणि नेहा देवकाते यांना सन 2020 मध्ये पुन्हा विकली.

त्यापोटी आरोपींनी सुप्रिया आणि नेहा यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. एकच जमीन दोन जणांना विकून आरोपींनी फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.