Talegaon Crime News : बापाने दोन्ही मुलींना ट्रकसमोर झोपवले अन त्यांच्यावर ट्रक चालवला; त्यानंतर त्याच ट्रकखाली स्वतः केली आत्महत्या 

एमपीसी न्यूज – मुलगी व्हाट्सअ‍ॅपवर कोणत्यातरी मुलाशी बोलते म्हणून बापाने पोटच्या दोन्ही मुलींना ट्रकखाली झोपवले आणि त्यांच्या अंगावर ट्रक चालवला. त्यानंतर त्याच चालत्या ट्रकखाली येऊन बापानेही आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी (दि. 18) पहाटे एक वाजता ही धक्कादायक घटना घडली.

नंदिनी भरत भराटे (वय 18), वैष्णवी भरत भराटे (वय 14), भरत ज्ञानदेव भराटे (वय 40, सर्व मूळ रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर. सध्या रा. अल्फानगरी इंदोरी, ता. मावळ जि. पुणे) अशी मयतांची नावे आहेत. मयत मुलींच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत बापाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत मुलगी नंदिनी ही तिच्या मोबाईल व्हाट्स अ‍ॅपवर कोणत्यातरी मुलाला चॅटिंग करत होती. ती फालतू वागत आहे, असा संशय भरत याला होता. याचा राग अनावर झाल्याने भरत याने दोन्ही मुलींना (नंदिनी, वैष्णवी) ठार मारण्याच्या उद्देशाने दमदाटी केली.

रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास दोन्ही मुलींना भरत याने रस्त्यावर झोपवले. त्यानंतर भरत याच्या मालकीचा ट्रक (एम एच 12 / एच डी 1604) चालू करून मुलींच्या अंगावरून चालवला. ट्रक चालू स्थितीत असताना ट्रकमधून खाली उडी मारुन स्वतः ट्रकच्या समोर झोपून भरत याने आत्महत्या केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.