Talegaon Crime News : गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कारागृहातून सुटल्यानंतर रॅली काढणे कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना चांगलेच महागात पडले आहे. सुरुवातीला दहशत माजवल्याचा गुन्हा दाखल असताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात नवीन दरोड्याचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. यामुळे मारणे आणि त्याच्या साथीदारांची पुढील काळात धरपकड केली जाणार आहे.

गजानन मारणे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारणे याची 15 फेब्रुवारी 2021 रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या पिलावळीने गजाची शेकडो गाड्यांच्या ताफ्यात तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई- द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी मारणेच्या साथीदारांनी टोल न देता वाहने पुढे नेली तसेच पाण्याच्या बाटलीचे पैसे दिले नाहीत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर उघडकीस आला. त्यामुळे गजा मारणे आणि साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रॅली प्रकरणात यापूर्वी शिरगाव चौकी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शिरगाव पोलिसांनी आतापर्यंत 14 वाहने जप्त केली असून 36 जणांना अटक केली आहे.

दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने गजानन मारणे टोळी मोक्काच्या कारवाईसाठी पात्र झाली आहे. त्याबाबत योग्य कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातून मारणे असेल किंवा अन्य कोणत्याही टोळीची पाळेमुळे उखडून टाकली जाणार असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.