Talegaon Crime News : कामगाराच्या मृत्यूप्रकरणी गंगा पेपर मिलच्या अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – कंपनीतील सेलो टॅंक मध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गंगा पेपर मिलच्या एका अधिकाऱ्याला अटक केली आहे.

गंगापेपर मिल युनिट हेड विद्याशंकर द्विवेदी असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अनुकूल लाहा असे मृत कामगाराचे नाव आहे. मानसी अनुकूल लाहा वय (41, रा. गंगा पेपर मिल कामगार वसाहत, बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गंगापेपर मिल युनिट हेड विद्याशंकर द्विवेदी आणि अन्य जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानसी लाहा यांचे पती गंगापेपर मिल मध्ये काम करत होते. 1 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या पतीचा कंपनीतील सेलो टॅंक मध्ये पडून मृत्यू झाला.

याबाबत आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला सुरक्षा उपकरणे पुरवली नाहीत. तसेच सेलो टॅंक येथे सुरक्षा साहित्य बसवले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या पतीने आरोपींना कंपनीत सुरक्षा साहित्य बसविण्याबाबत वारंवार सांगितले होते. मात्र आरोपींनी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले.

फिर्यादी यांच्या पतीच्या निधनानंतर आरोपींनी फिर्यादींना कंपनीच्या वसाहतीमधून हाकलून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला नव्हता. सुमारे नऊ महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदन, अर्ज केले. दरेकर यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे फिर्यादी यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी द्विवेदी याला बुधवारी (दि. 14) सकाळी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला जेल कस्टडी मंजूर केली. दरम्यान आरोपीने जामीन मंजूर करून घेतला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.