Talegaon Crime News : मराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 50 हजारांना लुटले

एमपीसी न्यूज – ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर सव्वा लाख रुपये दे’ अशी मागणी करत एका कार चालकाने मराठी अभिनेता योगेश सोहोनी याला एटीएम मधून 50 हजार रुपये जबरदस्तीने काढण्यास लावून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे एक्झिटजवळ घडली.

अभिनेता योगेश माधव सोहोनी (वय 32, रा. मुंबई) यांनी याबाबत सोमवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका स्कॉर्पिओ कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहोनी शनिवारी सकाळी त्यांच्या कार मधून मुंबईहून पुण्याला येत होते. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सोमाटणे एक्झिटजवळ एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. स्कॉर्पिओ चालकाने सोहोनी यांना हात दखाबून थांबण्यास सांगितले. त्यामुळे सोहोनी यांनी कार थांबवली.

स्कॉर्पिओ मधून एक व्यक्ती उतरला आणि सोहोनी यांच्याकडे आला. ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताची कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायची नसेल तर तू एक लाख 25 हजार रुपये दे. नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल.’ अशी आरोपीने सोहोनी यांना धमकी देऊन पैशांची मागणी केली.

सोमाटणे फाटा येथील एटीएम जवळ नेऊन सोहोनी यांना 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. सोहोनी यांनी एटीएम मधून पैसे काढले असता ते पैसे जबरदस्तीने घेऊन आरोपी स्कॉर्पिओ चालक पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.