Talegaon Crime News : लाच प्रकरणातील मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकाला पोलीस कोठडी

एमपीसीन्यूज : व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक केलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकाला मंगळवारी (दि.1) शिवाजीनगर (पुणे) जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.2) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड मंगळवारी (दि.1) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात हजर झाले.

मुख्याधिकारी श्याम लक्ष्मण पोशेट्टी (वय 40, रा. फ्लोरा सिटी तळेगाव दाभाडे ता. मावळ) व उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत ठेकेदार यांनी विविध ठिकाणी व्यायाम साहित्य पुरवठा केल्याची 55 लाख रुपयांची एकूण 4 बिले नगरपरिषदेकडून ठेकेदाराला देणे होते.

ती बिले काढण्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड यांनी ठेकेदार यांच्याकडे केली. या मागणीला मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांनी सहमती दिली होती.

संबंधित ठेकेदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील बिले, पोलीस नाईक वैभव गोसावी, महिला पोलीस कर्मचारी पूजा पागिरे व चालक दामोदर जाधव यांच्या पथकाने मुख्याधिकारी पोशेट्टी यांना अटक केली तर उद्यान पर्यवेक्षक मिंड फरार झाले होते. मात्र ते मंगळवारी (दि.1) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे हजर झाले.

लाच प्रकरणातीलआरोपी मुख्याधिकारी पोशेट्टी व उद्यान पर्यवेक्षक मिंड यांना जिल्हा सत्र विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना बुधवार (दि.2) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

साक्ष व पुरावे पडताळणी करुन 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे आरोपीकडून निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.