Talegaon Crime News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर टेम्पोला स्विफ्ट कारची मागून धडक

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या एका टेम्पोला भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने मागून धडक दिली. यामध्ये टेम्पो आणि कार या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्विफ्ट चालक आणि सहप्रवासी महिला हे दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 16) रात्री नऊ वाजता गहुंजे गावच्या हद्दीत घडला.

टेम्पोचालक विजय संभाजी माळी (वय 28, रा. रुई, पोस्ट मालेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्विफ्ट कार (एम एच 12 / के जे 8216) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा टेम्पो (एम एच 13 / ए एक्स 2634) टाॅयल कारटून घेऊन सोलापूर ते जेएनपीटी पनवेल येथे जात होते. बुधवारी रात्री नऊ वाजता ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे गावच्या हद्दीत आले असता रस्त्याचे काम करण्यासाठी रस्त्यावरून वळण दिल्याने फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो इंडिकेटर लावून दुसऱ्या लेनकडे वळवला. त्यावेळी भरधाव वेगात येत असलेल्या एका स्विफ्ट कारने त्यांच्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये टेम्पोचे आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कार चालक आणि कार मधील सहप्रवासी महिला हे दोघेजण जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.