Talegaon Crime News : लाच मागितल्याप्रकरणी अटक नगरपरिषद मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकास न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून नऊ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षक यांची बुधवारी (दि.2) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी व उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी सोमवारी (दि. 31) गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांना मंगळवारी (दि. 1) शिवाजीनगर पुणे जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने बुधवार (दि. 2) पर्यंत पोलीस कोठडी दिली. मुदत संपल्याने पुन्हा बुधवारी (दि.2) न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपी पोशेट्टी व मिंड यांची येरवडा पुणे कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील बिले, पोलीस नाईक वैभव गोसावी, महिला पोलीस कर्मचारी पूजा पागिरे व चालक दामोदर जाधव यांच्या पथकाने आरोपींना येरवडा पुणे कारागृहात वर्ग केले.

या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.