Talegaon Crime News : लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची जामिनावर मुक्तता

एमपीसी न्यूज – व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षक यांची गुरुवारी (दि. 3) न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी व उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी (दि. 31) गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांना मंगळवारी (दि. 1) शिवाजीनगर पुणे जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने बुधवार (दि.2) पर्यंत पोलीस कोठडी दिली. मुदत संपल्याने पुन्हा बुधवारी (दि.2) न्यायालयात हजर केले असता, न्यायाधिशांनी गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपी पोशेट्टी व मिंड यांची येरवडा पुणे कारागृहात रवानगी केली होती.

गुरुवारी (दि.३) शिवाजीनगर पुणे जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने पोशेट्टी व मिंड यांना जामिनावर सोडून देण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील बिले, पोलीस नाईक वैभव गोसावी, महिला पोलीस कर्मचारी पूजा पागिरे व चालक दामोदर जाधव यांच्या पथकाने आरोपींना येरवडा पुणे कारागृहात वर्ग केले.

या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.