Talegaon Crime News : वर्दीची कॉलर पकडून पोलिसाला बघून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज – ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीची कॉलर पकडून पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच पोलिसाला बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाबारा वाजता सोमाटणे येथे एका ढाब्यावर घडली.

सुबोध सुरेश कुलकर्णी, गणेश उर्फ स्वप्नील सुरेश कुलकर्णी (दोघे रा. कैलासनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक वैभव सुभाष नलगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी सोमाटणे येथील भजनसिंग ढाबा येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करताना त्यांची हॉटेलमधील इतर लोकांसोबत भांडणे झाली. याबाबत नागरिकांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना फोन कडून माहिती दिली. त्यावेळी रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भोसले आणि फिर्यादी पोलीस नाईक नलगे हॉटेलमध्ये गेले.

पोलिसांना पाहून आरोपी शिवीगाळ करत पोलिसांच्या अंगावर धावून आले. आरोपी गणेश याने फिर्यादी पोलीस नाईक नलगे यांच्या वर्दीची कॉलर पकडली आणि झटापटी केली. तसेच फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.