Talegaon crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रक चालकाला मारहाण करून लुटले

ट्रक चालकाकडून रोख रक्कम आणि मोबईल फोन असा एकूण 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला.

0

एमपीसी न्यूज – अहमदाबाद येथून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रक चालकाला अनोळखी चार चोरट्यांनी मारहाण करून लुटले. ट्रक चालकाकडून रोख रक्कम आणि मोबईल फोन असा एकूण 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 15) पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से ( ता. मावळ) येथे घडली.

दत्तूसिंग जम्मनसिंग चव्हाण (वय 48, रा. अचलेर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण आणि त्याचे साथीदार पुन्नाप्पा श्रीशैल कुंभार हे दोघेजण दोन ट्रकमधून अहमदाबाद (गुजरात) येथून माल घेऊन सोलापूर येथे जात होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना ते उर्से येथे लघुशंकेसाठी थांबले.

लघुशंका करून पुन्हा ते ट्रकमध्ये आले असता अनोळखी चार चोरट्यांनी त्यांना काठीने डोक्यात आणि हातावर मारले.

त्यानंतर चव्हाण यांच्याकडून 25 हजारांची रोख रक्कम आणि 8 हजाराचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून चोरटे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.