Talegaon Crime News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन कंटेनर चालकांना लुटले

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या बाजुला कंटेनर थांबवून त्यात झोपलेल्या दोन चालकांना तिघांनी मिळून लुटले. ही घटना सोमवारी (दि. 2) पहाटे तीन वाजताच्या सुमारास शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपासमोर घडली.

विनोद छेदीलाल गुप्ता (वय 41, रा. कटफळ, ता. बारामती) यांनी याबाबत शिरगाव पोलीस चौकीमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद गुप्ता हे कंटेनर (एम एच 42 / टी 9554) चालक आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीतील भारत पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर गुप्ता यांनी त्यांचा कंटेनर रस्त्याच्या बाजूला पार्क केला. त्यानंतर ते कंटेनरच्या केबिनमध्ये झोपले. सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी कंटेनरच्या केबिनमध्ये येऊन गुप्ता यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

चोरटे मोबाईल फोन आणि रक्कम चोरून जात असताना गुप्ता यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी तिघांनी मिळून गुप्ता यांना दगडाने आणि हाताने बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी दुसरा ट्रक (के ए 53 / बी 7159) चालक ट्रकच्या केबिनमध्ये झोपला असता त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 22 हजार रुपये रोख रक्कम व कागदपत्रे असा एकूण 37 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.