Talegaon Crime News: चायनीज पदार्थांची गाडी लावण्यावरून दोन गटांत हाणामारी, माजी नगरसेवकासह तिघे जखमी

एमपीसी न्यूज – चायनीज पदार्थांची गाडी लावण्याच्या कारणावरून दोन हॉटेल व्यावसायिकांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवकासह दोन्ही गटातील तीनजण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहे.यामध्ये एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

तळेगाव स्टेशन भागात मनोहर नगर येथील सत्यकलम कॉलनीमध्ये आज (मंगळवारी) सकाळी ही घटना घडली. यामध्ये माजी नगरसेवर सुनील मारुती कारंडे (वय 49,  रा. मनोहरनगर, सत्यकलम कॉलनी) तसेच दुस-या गटातील पोपट सुर्वे (वय 58), आदित्य सुर्वे (वय 27 दोघेही रा.मनोहरनगर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर तळेगाव स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माजी नगरसेवक सुनील कारंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोपट सुर्वे, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा आदित्य व एक अनोळखी इसम यांनी दगड आणि लोखंडी गजाने राहत्या घराजवळ येऊन मारहाण केली. तसेच आदित्य पोपटराव सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी मारुती कारंडे, ऋषीकेश सुनील कारंडे, सुनील मारुती कारंडे, प्रथमेश कारंडे, शैलेश कारंडे, शिवाजी कारंडे यांच्या पत्नी यांनी काठी, दगड आणि लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

मनोहरनगरच्या प्रवेशद्वाराजवळ सुर्वे व कारंडे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. या ठिकाणी चायनीज पदार्थांची गाडी लावण्यावरून हा वाद निर्माण झाला. त्यातून पुढील हाणामारीची घटना घडली.

तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.