Talegaon Crime News : शिडीवरून पाय घसरून पडल्याने कामगार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – वेल्डिंग हेल्पर म्हणून काम करत असलेल्या एका कामगाराचा शिडीवरून पाय घसरला आणि कामगार 15 ते 20 फूट उंचीवरून खाली पडला. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिरगाव येथे साई मंदिराच्या मागे 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

रवींद्र बाबुराव साळुंके (रा. बिजलीनगर, आकुर्डी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी जखमी कामगाराच्या पत्नी शिला रवींद्र साळुंके (वय 36) यांनी सोमवारी (दि. 12) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अनिल विठ्ठल विराजदार (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जखमी पती रवींद्र आरोपी अनिल याच्याकडे वेल्डिंग हेल्पर म्हणून काम करत होते. 26 सप्टेंबर रोजी शिरगाव येथे साई मंदिराच्या मागच्या बाजूला प्रशांत चव्हाण यांच्या पत्र्याच्या शेडचे काम सुरु होते. काम करत असताना रवींद्र 15 ते 20 फूट उंचीवरून शिडीवरून पाय घसरून पडले.

त्यावेळी आरोपी अनिल याने रवींद्र यांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली नव्हती. त्यामुळे रवींद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.