Talegaon crime News : तळेगावात भाच्याने मामाला जिवंत जाळले

एमपीसी न्यूज – पत्नीच्या भावाच्या मुलाने मामाला जिवंत जाळले. हा धक्कादायक प्रकार आज (मंगळवारी, दि. 20) पहाटे जाधव चाळ, तळेगाव दाभाडे येथे घडला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विजयसिंग भगवानसिंग जव्हेरी (वय 55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मीना विजयसिंग जव्हेरी (वय 47, रा. जाधव चाळ, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नारायणसिंग विजयसिंग जव्हेरी, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी मीना यांना एक मुलगा आहे. तो त्याच्या पत्नी आणि मुलासोबत मध्य प्रदेश मधील इंदोर येथे सोन्याचे दागिने गाठण्याचे काम करतो. 20 वर्षांपूर्वी मयत विजयसिंग यांचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले. तेंव्हापासून ते काम करत नव्हते. मागील पाच ते सहा महिन्यांपासून विजयसिंग अंथूरणाला खिळलेले होते.

फिर्यादी मीना यांचा लहान भाऊ त्याच्या कुटुंबासोबत पंढरपूर येथे राहत होता. मात्र, त्याचा मुलगा आरोपी नारायणसिंग हा दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याने मीना यांचा लहान भाऊ त्याच्या परिवारासोबत मीना यांच्या तळेगाव दाभाडे येथील घराजवळील खोलीत मागील 15 दिवसांपासून राहत आहेत.

तळेगावात राहत असताना देखील नारायणसिंग दारू पिऊन येऊन त्याच्या आईला व भावाला शिवीगाळ करत भांडणे करत असे. अधूनमधून त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मीना जात होत्या. मात्र नारायणसिंग कुणाचेही ऐकत नव्हता.

सोमवारी (दि. 19) दिवसभर नारायणसिंग याने दारू पिऊन त्याच्या घरच्यांसोबत भांडण केले. मंगळवारी (दि. 20) पहाटे तीन वाजताच्या सुमारास नारायणसिंग हा मीना यांच्या घरात जबरदस्तीने आला.

‘माझ्या घरात मला झोपायला घेत नाही का. तू मला घरात घे, नाहीतर मी तुला दगडाने मारून टाकीन. तुझ्या नवऱ्याला इथून हाकल. मला सोफ्यावर झोपू दे. नाहीतर मी त्यालापण मारून टाकीन’ अशी नारायणसिंग याने मीना यांना धमकी दिली.

मीना घाबरून घरातून बाहेर पाळल्या आणि घर मालकीणीकडे गेल्या. घर मालकिणीचा मुलगा प्रसाद जाधव हा नारायणसिंग याला समजवण्यासाठी आला. मात्र नारायणसिंग हा कुणाचेही न ऐकता मीना यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून येत होता. त्यामुळे नारायणसिंग याला मीना यांनी घरातच कोंडले आणि बाहेरून कडी लावली.

पहाटे चार वाजताच्या सुमारास मीना तळेगाव दाभाडे पोलिसांकडे आल्या. पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. सर्व प्रकार ऐकून तळेगाव पोलीस मीना यांच्यासोबत त्यांच्या घरी आले.

त्यावेळी घरातून धूर निघत होता. घरात जाऊन बघितले असता मीना यांचे पती विजयसिंग यांना आग लागली होती. पोलिसांच्या मदतीने आग विझवण्यात आली. आरोपी नारायणसिंग याने दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून विजयसिंग यांना पेटवून देऊन त्यांचा खून केला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.