Talegaon Crime : एमआयडीसीत जमीन गेलेल्या 11 शेतकऱ्यांची एक कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (आंबी) एमआयडीसीमध्ये जमीन गेलेल्या 11 शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन एकाने त्यांना जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवले. खोटे कुलमुखत्यारपत्र बनवून 11 शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन एमआयडीसीकडून मोबदला मिळवला. शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदल्याचे पैसे येताच बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून तसेच स्वतःच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक हितसंबंधांच्या आधारे सर्व रक्कम हडप केली.

याबाबत फसवणूक झालेल्या अकरा शेतक-यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे आपली कैफियत निवेदनाद्वारे मांडली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनाही पीडित शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

शिवाजी बळीराम बनसोडे, सुरेश धोंडिबा बनसोडे, दत्तात्रय येदु बनसोडे, प्रकाश संतू बनसोडे, बाळू राघू बनसोडे, बाळू सोपान बनसोडे, वैभव संभाजी बनसोडे, राजेश नंदू बनसोडे, अमोल मनोहर बनसोडे, अतुल रमेश बनसोडे, वर्षा उमेश गायकवाड (सर्व रा. आंबी, ता. मावळ) यांनी गृहमंत्र्यांकडे कैफियत मांडली आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरील सर्वजण आंबी येथील शेतकरी आहेत. त्यांची 152 गुंठे जमीन आंबी एमआयडीसीमध्ये अधिग्रहित करण्यात आली आहे. त्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे सुनील अंबादास साळवे (रा. साने चौक, चिखली) यांनी आश्वासन दिले. त्यासाठी साळवे यांनी संबंधित 11 शेतक-यांच्या अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन सर्वांकडून खोटे कुलमुखत्यारपत्र तयार केले. शेतकऱ्यांना जाणीव करून न देता त्यांच्या सह्या घेतल्या.

सर्व प्रकल्पग्रस्तांचे थरमॅक्स चौक, चिंचवड येथील एका सहकारी बँकेत बचत खाते सुरु करून घेतले. साळवे यांनी त्यांच्या राजकीय, आर्थिक हितसंबंधांचा उपयोग करून बँकेकडून प्रकल्पग्रस्त 11 शेतकऱ्यांच्या नावाचे चेकबुक परस्पर घेतले. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे साळवे यांनी परस्पर साई एंटरप्रायजेस, बालाजी कन्स्ट्रक्शन, शर्मा नरेश रामगोपाल, यश लँड डेव्हलपर्स, सागर निवृत्ती, नाईस कार्पेट अँड वॉलपेपर्स, शली भद्रा शहा इत्यादींच्या बँक खात्यावर परस्पर ट्रान्स्फर करून घेतले.

त्या रकमेपैकी काही रक्कम साळवे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित एक कोटी दोन लाख रुपये एवढी रक्कम न देता स्वतः हडप केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये दोषी असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा. संबंधित बँकेची चौकशी करण्यात यावी. साळवे यांनी आणखी काही लोकांना फसवले आहे का, याची चौकशी व्हावी. साळवे यांनी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे, त्याबाबत कारवाई व्हावी.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून ज्यांच्या खात्यावर रक्कम गेली आहे, त्यातील कोणालाही प्रकल्पग्रस्त शेतकरी ओळखत नाहीत. त्यामुळे त्या सर्वांची चौकशी व्हावी. साळवे यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, अशा मागण्या तक्रार अर्जात करण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.