Talegaon Crime : शिरगाव पोलिसांकडून तीन दिवसात चार दारूभट्ट्या उध्वस्त

एमपीसी न्यूज – शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या दारुभट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठ्या प्रमाणात दारुभट्ट्यांवर कारवाई केली जात आहे. थेट छापा मारून दारूभट्टी उध्वस्त करत मुद्देमाल नष्ट केला जात आहे. मंगळवार (दि. 24) ते गुरुवार (दि. 26) या तीन दिवसांच्या कालावधीत शिरगाव पोलिसांनी तब्बल चार दारूभट्ट्यांवर कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून सर्व धंदे बंद कारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस प्रमुख अवैध धंद्यांच्या मागे लागले आहेत. त्यात गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा पथकांकडून देखील कारवाई केली जात आहे. मंगळवारी सांगवडे आणि शिरगाव येथील दोन दारुभट्ट्यांवर कारवाई केली. त्यानंतर बुधवारी एक आणि गुरुवारी एका दारूभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये राहुल जिवन मन्नावत, हमराज नटवरसिंग रजपुत, मर्जिना हमराज रजपुत, पारु ईश्वर रजपुत, पुनम अकबर नानावत हे पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. पोलिसांनी पाच हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन, पाच हजार लिटर मापाचे लोखंडी पात्र, अल्युमिनियम जाळी, चाटू, 10 लोखंडी डब्बे, सहा प्लास्टिक मोकळे कॅन असा एकूण पाच लाख 50 हजार 700 रुपयांचा ऐवज नष्ट करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावीत, पोलीस नाईक गुुरव, पाटील, पोलीस कॉन्स्टेबल फडतरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.