Talegaon Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. यामध्ये 8 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.

मर्जिना हेमराज राजपूत (वय 40, रा. शिरगाव), पूनम अकबर नानावत (वय 43, रा. शिरगाव) अशी कारवाई केलेल्या महिलांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, मावळ तालुक्यातील शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दोन महिला गावठी दारू तयार करून विकत आहेत. त्यानुसार पोलिसांनी भट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 8 लाख रुपयांचे 16 हजार लिटर कच्चे रसायन, साडेसात हजारांचे सरपण, 12 हजार 200 रुपयांचा एक जनरेटर, तीन हजारांची जर्मलची एक थाळी, 500 रुपयांचे दोन जर्मलचे चाटू असा एकूण 8 लाख 23 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी भट्टी चालवणा-या दोन महिलांना देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट कलम 65 (क) (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अनिल शिंदे, गणेश करोटे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.