Talegaon Crime : आंबळे गावात पाईप, तलवार, दगडाने दोन गटात तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज – रस्त्यात शेण टाकणे, किरकोळ वाद घालणे अशा कारणांवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी आठ वाजता मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समीर मोतीराम आंभोरे (वय 33, रा. आंबळे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुकाराम ज्ञानोबा आंभोरे, खंडू तुकाराम आंभोरे, वैभव रामदास आंभोरे, दत्तात्रय तुकाराम आंभोरे, मारुती तुकाराम आंभोरे, सुशीला तुकाराम आंभोरे, सुरेखा खंडू आंभोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी समीर यांचे नातेवाईक अनिकेत शेटे याच्यासोबत वाद घातला. याचा समीर यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी लोखंडी पाईप, तलवार, दगड घेऊन येऊन समीर आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात मारुती तुकाराम आंभोरे (वय 30, रा. आंबळे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत सुभाष शेटे, समीर मोतीराम आंभोरे, भानुदास मधुकर शेटे, सुभाष मधुकर शेटे, पांडुरंग सीमारास आंभोरे, सीताराम ज्ञानोबा आंभोरे, तुषार मोतीराम आंभोरे, बायडाबाई सीताराम आंभोरे, अलका पांडुरंग आंभोरे, कमल सुभाष शेटे, श्रावणी पांडुरंग आंभोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांनी मुद्दाम रस्त्यात शेण टाकल्याचा आरोपींचा समज झाला. तसेच फिर्यादी मारुती आणि त्यांच्या नातेवाईकांनी अनिकेत शेटे याच्याशी वाद घातला. यावरून आरोपींनी मारुती आणि त्यांच्या नातेवाईकांना लोखंडी रॉड, पाईप, दगडाने बेदम मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.