Talegaon Dabahde : कलापिनीच्या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज- कै कल्पना अरविंद करंदीकर स्मृती पुष्प निमित्त कलापिनी मध्ये 15 ते 30 एप्रिल दरम्यान झालेल्या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात सर्व मुलांनी विविध गुणदर्शनाचे सुंदर कार्यक्रम सादर केले.

‘नटरंग’ आणि ‘जाऊ दे नव’ ही दोन नृत्ये मुलांनी सादर केली. याचे दिग्दर्शन अनघा कुलकर्णी व मुक्त भावसार यांचे होते. संस्कृतमध्ये सादर झालेली सुभाषिते आरती पोलावार यांनी शिकवली होती. ‘गाणे गारे पावसा’ आणि ‘स स सुट्टी’ ही दोन गाणी चांदणी पांडे यांनी तयार करून घेतली होती. पेटीची साथ प्रदीप जोशी आणि तबल्याची साथ अनिरुद्ध जोशी यांनी केली होती.

मुंगीबाई आणि जंबो सर्कस ही दोन प्रसंग नाट्ये नयना डोळस आणि मधुवंती हसबनीस यांनी बसविली होती. शिवराज्याभिषेक सोहळा हे नाट्य सर्व शिक्षिकांच्या मेहनतीचे सुंदर फळ होते, त्याचे दिग्दर्शन विशाखा बेके हिने केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम खूप छान सादर केले. नटरंग, जंबो सर्कस आणि शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.

नृत्य, नाट्य, गायन या बरोबरच शिबिरामध्ये मधुवंती रानडे, वृषाली आपटे, व पल्लवी पांढरे यांनी क्राफ्ट व पपेट्स बनविण्यास शिकविले. ज्योती देशपांडे यांनी माती कामामधून विविध कलाकृती शिकविल्या. बाल काव्यसंमेलनाची जबाबदारी कांचन सावंत यांनी सांभाळली. व्यायामाचे प्रकार आणि योगासने बकरे काकांकडून मुले हसत खेळत शिकले. चैतन्य दादाबरोबर राजगड किल्ला बनविताना मातीमध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद मुलांना मिळाला. या संपूर्ण शिबिराला रानडे आणि बुरसे यांनी पूर्ण सहकार्य केले आणि शिबिराची पूर्ण जबाबदारी विशाखा बेके यांनी सांभाळली.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद करंदीकर होते तर प्रमुख पाहुणे प्रेरणा फाउंडेशनच्या प्रभा जाधव आणि समुपदेशक ज्योती गोखले होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनंत परांजपे यांनी केले. सूत्रसंचालन अनघा कुलकर्णी, मधुवंती हसबनीस, विशाखा बेके, अंजली सहस्रबुद्धे यांनी केले. कार्यकारिणी सदस्य डॉ आनंद वाडदेकर यांनी आभार व्यक्त केले. सुमेर नंदेश्वर यांचे ध्वनी संयोजन होते. उमेश सरदार यांचे तर्फे मुलांना खाऊ देण्यात आला. प्रतीक मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगमंच व्यवस्थेचे उत्तम नियोजन केले.  डॉ अनंत परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली सहस्रबुद्धे यांनी शिबिराचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.