Talegaon Dabhade: तडीपार असतानाही शिवजंयतीला आलेले सख्खे भाऊ गजाआड

एमपीसी न्यूज – तडीपार असूनही उजळ माथ्याने फिरत शिवजंयतीला आलेल्या दोन सख्या भावांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी मावळातील शिरगाव येथून अटक केली आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.12) ही कारवाई करण्यात आली.

अर्जुन महादेव गोपाळे (वय 26) आणि शंकर महादेव गोपाळे (वय 29, दोघे रा. शिरगाव खळवाडी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या भावांची नावे आहेत. त्यांना 17 ऑक्टोबर 2019 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे शहर, जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

शिवजंयतीच्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस चिखली ठाण्याच्या हद्दीत फरार, तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या स्टेशनच्या रेकॉर्डवरील तडीपार असलेले दोन सख्खे भाऊ शिरगाव येथील शिवजयंतीमध्ये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. शिरगावातील शिवजयंतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ हे दोघे भाऊ उभे असलेले दिसले.

त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तडीपार कालावधीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येण्याची परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली असता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरमेठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, गावंडे, पोलीस हवालदार कोकाटे, पोलीस नाईक महेंद्र तातले, अंजनराव सोडगीर, जायभाये, सचिन मोरे, प्रमोद गरजे, परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.