Talegaon Dabhade : बेवारस 22 दुचाकी मूळ मालकांना परत

तळेगाव दाभाडे पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली बावीस दुचाकी वाहने त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आली. हा उपक्रम तळेगाव दाभाडे पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेचे निमित्त साधून राबविण्यात आला.

दुचाकी वाहने चोरी गेल्यानंतर वाहनांच्या मालकांनी वाहने परत मिळण्याची आशा जवळपास सोडून दिलेली असते. काहीजणांकडून हरवलेल्या वाहनांबाबत पोलिसात तक्रार दिली जाते. तर दुसरीकडे सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीची वाहने धूळ खात पडलेली असतात. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देखील मागील अनेक दिवसांपासून काही बेवारस वाहने धूळ खात पडली आहेत. गंगामाता वाहन शोध संस्थेचे प्रमुख राम उदावंत यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्याशी संपर्क साधला. धूळ खात पडलेली वाहने आपण मूळ मालकांना परत करू शकतो. ही संकल्पना त्यांनी काटे यांना समजावून दिली.

वाहनांच्या चासी व इंजिन नंबरवरून आरटीओच्या मदतीने वाहन शोध संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 22 दुचाकींच्या मूळ मालकांशी संपर्क केला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या बावीस दुचाकींच्या मूळ मालकांना त्यांच्या दुचाकी सुपूर्द करण्यात आल्या. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपली हरवलेली वाहने परत मिळाल्याने सर्व वाहन मालकांनी पोलिसांच्या आणि संस्थेच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे, पोलीस कर्मचारी नागरगोजे, गवारी, चव्हाण, युवराज वाघमारे, महेंद्र रावते, प्रशांत वाबळे, रामदास बहिरट, वर्षा मलघे, वैशाली बोरकर, सरस्वती वाघमारे, तेजस लेले, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, राधा उदावंत, गणेश काळे, भारत वाघ, गोरख नवसुपे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.