Talegaon Dabhade : लेखक, कवी वसंत शिंदे द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

तळेगाव दाभाडे- येथील प्रसिद्ध लेखक व कवी वसंतराव मुरलीधर शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आज गुरुवारी (दि 9) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव जनरल हाॅस्पिटलच्या रिक्रिएशन हाॅलमध्ये आज, गुरुवारी सायं 6 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून वैराग्यमूर्ती हभप शंकरमहाराज मराठे यांना मावळ वारकरीभूषण पुरस्काराने तर कान्हेवाडी गावचे (ता.खेड) आदर्श सरपंच भाऊसाहेब तथा नवनाथ पवार यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रशेखर शिंदे यांनी दिली.

हे पुरस्कार वारंगवाडी मावळ येथील स्वामी निरंजन आश्रमाचे स्वामी निरंजनानंद सरस्वती परमहंस व माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांच्या हस्ते देण्यात येतील. समारंभाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब तथा साहेबराव काशिद उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी सायं 5 ते 6 हरिपाठ होणार असून त्यानंतर 7 ते 8 या वेळात जीवन विद्या मिशनचे संतोषदादा तोत्रे यांचे प्रबोधन होईल. यानंतर स्नेहभोजन होईल.

प्रा डाॅ प्रमोद बोराडे, शिवाजीराव पवार, जगन्नाथ भेगडे पाटील, दीपक राऊत, भाऊसाहेब गायकवाड, नीता देशपांडे, किसनराव ठाकूर, अण्णासाहेब दाभाडे, हभप नंदकुमार भसे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रशेखर शिंदे व त्यांचे परिवाराने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.