Talegaon Dabhade : विक्रीसाठी आणलेला सव्वासहा किलो गांजा जप्त; एकाला अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेला सहा किलो 240 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवार पेठ, तळेगाव दाभाडे येथे केली.

रोहित आण्णा शिंदे (वय 41, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील मंगळवार पेठेत सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती संशयितरित्या थांबली असून त्या व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहित याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे एक लाख 56 हजार रुपये किमतीचा सहा किलो 240 ग्रॅम वजनाचा गांजा आणि ७२० रुपयांची रोकड मिळून आली. पोलिसांनी सर्व ऐवज जप्त करत त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी रोहित याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.