Talegaon Dabhade: कोरोनाविरुद्धच्या लढाईतील 75 वर्षीय योद्धा… खंडागळे मास्तर!

एमपीसी न्यूज (प्रभाकर तुमकर) – युद्धाचे बिगुल वाजले की कोणताही योद्धा स्वस्थ बसूच शकत नाही.  असाच एक 75 वर्षीय योद्धा कोरोनाविरुद्ध रणभूमीवर उतरला आहे. किसन बाळू खंडागळे असे या तळेगाव दाभाडे येथील या लढवय्याचे नाव आहे. निवृत्तीनंतर घरी आरामात जीवन कंठण्याऐवजी या वयात खंडागळे मास्तरांनी स्वतःला रुग्णसेवेत झोकून दिले आहे. तरुण डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून खंडागळे मास्तर या सर्वांनाच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नवे बळ देत आहेत.

सेवा म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे किसन बाळू खंडागळे! “जनसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य आपल्या कृतीमधून सत्यात उतरवणारा हा अवलिया आहे. खंडागळे 1967 साली तळेगाव जनरल हाॅस्पिटलमध्ये वाॅर्ड बाॅय म्हणून रूजू झाले होते. मास्तर म्हणून संपूर्ण  हाॅस्पिटलमधे प्रसिद्ध असलेल्या खंडागळे यांच्या मनात पहिल्यापासूनच समाजसेवेचा ध्यास होता. सलग 45 वर्षे रूग्णांची सेवा करून ते सेवानिवृत्त झाले.

_MPC_DIR_MPU_II

वयाची पंच्याहत्तरी चालू असली तरीही मास्तरांच्या मनात तीच समाजसेवेची आस कायम आहे. तळेगाव दाभाडे मध्ये कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयात (जनरल हाॅस्पिटल) पुणे जिल्हा परिषदेच्या तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्क्रिनिंग टेस्ट सुरू करण्यात आली, परंतु तिथे एका अनुभवी व्यक्तीची गरज होती. सर्वांच्या मुखातुन एकच नाव निघाले… ‘मास्तर’!

तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी मास्तरांना बोलावले व तिथे बसण्याची विनंती केली, मास्तरांनी विनंती लगेच मान्य केली, मात्र त्यांनी एक अट घातली. या सेवेच्या मोबदल्यात कोणतेही मानधन घेणार नाही. किती हा मनाचा मोठेपणा! पूर्वीप्रमाणेच घडाळ्याच्या काट्याकडे न बघता खंडागळे मास्तर मनोभावे रुग्णसेवा करण्यात रमले आहेत.

महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले, तसे कोरोनाच्या लढाईमध्ये हाॅस्पिटलचे सारथ्य मास्तर करत आहेत, असे गौरवोद्गार तळेगावकर काढत आहेत. खंडागळे मास्तर, तुमच्या या सेवाभावाला आणि लढाऊ वृत्तीला ‘एमपीसी न्यूज’चाही सलाम!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.