Talegaon Dabhade: तळेगावमध्ये साध्या पद्धतीने गणेशोत्सव, नगरपरिषदेच्या वतीने मूर्ती संकलन केंद्र

विसर्जन करणे शक्य नसल्यास नगरपरिषदेच्या वतीने गाव विभाग आणि तळेगाव स्टेशन विभागासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याची व्यवस्था केलेली आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव शहर परिसरात मानांच्या गणपतींसह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवर शासनाने बंदी घातलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी तसेच घरगुती गणपती विसर्जन संदर्भात आचारसंहिता घालून दिलेली आहे.

यावर्षी श्री गणेशाचे विसर्जन सार्वजनिक तळे, नदी, विहीर या ठिकाणी न करता घरामध्ये विसर्जन कुंड आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी विसर्जनकुंड तयार करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेआहेत. शुक्रवारी (दि.२८) सातव्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि तळेगाव शहरातील बहुतांशी घरगुती गणपतींचे विसर्जन होत आहे.

विसर्जन करणे शक्य नसल्यास नगरपरिषदेच्या वतीने गाव विभाग आणि तळेगाव स्टेशन विभागासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

श्री गणेशाची मूर्ती दान करण्यापूर्वी विसर्जनाची आरती घरीच करावी. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.

नागरिक आणि भाविकांच्या सोयीसाठी नगर परिषदेच्या वतीने गावविभाग आणि तळेगाव स्टेशन विभागासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने गाव भागासाठी मारुती मंदिर चौक येथील नगरपरिषदेच्या पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल येथे मूर्ती संकलन केंद्र उभारले आहे.

तळेगाव स्टेशन भागासाठी गोल ग्राउंड यशवंनगर आणि फ्रेंड्स ऑफ नेचर कार्यालय यशवंतनगर तसेच संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा आणि नवीन समर्थ विद्यालय या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.

मूर्ती विसर्जन करण्यासाठी लागणारी अमोनियम बायकार्बोनेट पावडर ही नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी तळेगाव स्टेशन विभागासाठी आरोग्य निरीक्षक मयुर मिसाळ (9011442160) आणि गाव विभागासाठी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले (9890821581) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.