Talegaon Dabhade: तळेगाव ते आंबी मार्गावरील इंद्रायणी नदीवरच्या पुलाच्या कामाला वेग

Talegaon Dabhade: Acceleration of work on bridge over Indrayani river from Talegaon to Ambi road नदीपात्रात त्याचप्रमाणे अलीकडे व पलीकडे खोलवर खड्डे घेण्यात आले असून इंद्रायणी नदीचे झिरपणारे पाणी डिझेल इंजिने लावून बाहेर फेकण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव ते आंबी व औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील इंद्रायणी नदीवरच्या पुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम करण्यात येत असून 31 मार्च 2021 पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळचे उपअभियंता व्ही एस भुजबळ व सहाय्यक अभियंता डी जे पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा खर्च 6 कोटी रूपये इतका मंजूर असून नियोजित वेळेच्या आत म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत पूल तयार असेल अशी खात्री अधिकारी देत आहेत. दोन्ही काठावरील अलीकडील व पलीकडील एब्यूटमेंटचे काम प्रगतीपथावर असून लॉकडाऊनमुळे काम काही दिवस बंद होते. परंतु यापुढे एक दिवसही काम बंद राहणार नसल्याचे उपअभियंता भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित कामाचे कंत्राट व्ही एस पटेल यांच्याकडे आहे. या कामासाठी काही परप्रांतीय मजूरही थांबलेले असून उर्वरित कामगार स्थानिक कंत्राटदारांकडे देण्यात आले आहेत.

नदीपात्रात त्याचप्रमाणे अलीकडे व पलीकडे खोलवर खड्डे घेण्यात आले असून इंद्रायणी नदीचे झिरपणारे पाणी डिझेल इंजिने लावून बाहेर फेकण्यात आले आहे.

पूर्वीच्या पुलापेक्षा या नवीन पुलाची उंची 2.70 मीटरने अधिक उंच असेल जेणे करुन नदीला कितीही महापूर आला तरी पाणी पुलावर येऊ शकणार नाही. या पुलाची रूंदी साडेसात मीटर असून त्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जा-ये करू शकतील. पुलाची लांबी 100 मीटर असून 20 मीटरचे पाच गाळे असतील.

तळेगाव स्टेशन परिसरातून यशवंतनगर तपोधाम कॉलनीमार्गे वराळे हद्दीतून पुढे आंबी व तेथून नवलाख उंब्रे अर्थात तळेगाव व औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जाईल.

आधीचा पूल 16 डिसेंबर 2019 रोजी अचानक पडल्यामुळे कल्हाट, पवळेवाडी, कशाळ, भोयरे, निगडे, शिरे, शेटेवाडी, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, मंगरूळ, गोळेवाडी, नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी त्याच बरोबर खेड तालुक्यातील अनेक गावांतील लोकांची येण्या- जाण्यासाठी मोठी गैरसोय झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.