Talegaon Dabhade: रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या भाजी व फळ विक्रेत्यांवर नगरपरिषदेकडून कारवाई

Talegaon Dabhade: Action taken by Municipal Council against unauthorized vegetable and fruit sellers on the road

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे शहरामध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्या भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांवर नगरपरिषद प्रशासनाकडून धडक जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईने अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची मोठी तारांबळ झाली.

 नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक इम्रान मुल्ला व सहकारी तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख प्रमोद फुले तसेच मयुर मिसाळ, संभाजी भेगडे, प्रवीण माने आदींनी ही कारवाई केली.

गेल्या  दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात लाॅकडाऊन सुरू आहे. यावेळी शहरातील सर्व दुकाने बंद असताना अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त भाजीपाला, फळभाज्या यांचे विक्रीस मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे. याचा गैरफायदा घेत या व्यापाऱ्यांनी शहरातील  मुख्य रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी अनाधिकृत आपली दुकानदारी सुरु केली होती.

या विक्रेत्यांकडून कोरोना संसर्गास रोखण्याविषयी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेल्या  नियमांचे पालन होत नव्हते.  या ठिकाणी ग्राहकांची विनाकारण गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगकडे पूर्णत:  दुर्लक्ष होत आहे. काही नागरिक तोंडाला मास्क न लावताच खरेदीच्या नावाखाली भटकत होते.

मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात नगरपरिषदेचे अतिक्रमणविरोधी कारवाई  पथक स्टेशन विभागातील विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी बाहेर पडले. ही कारवाई मोहीम तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.