Talegaon Dabhade: ‘ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालये कार्यान्वित करा’

नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे पुणे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक, मुंद्राक कार्यालये महिनाभर  बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातील खरेदी-खते, इतर गरजेचे दस्तऐवजांची नोंदणी ठप्प आहे. त्यामुळे सामान्य जनतेची अडचण होत आहे. राज्य सरकारने हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणची वाईन शॉप, इतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याचधर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालये पुन्हा कार्यानिव्त करावीत, अशी मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी केली आहे. जेणेकरुन नागरिकांची कामे होतील आणि सरकारला महसूलही मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन मेल करण्यात आले आहेत. त्यात  काकडे यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज 20 मार्चपासून बंद करण्यात आले आहे. त्यानंतर देशभरत लॉकडाउनही जाहीर झाला. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालये, मुंद्राक, जिल्हाधिकारी कार्यालये देखील बंद आहेत.

आता लॉकडाउनचा  तिसरा टप्पा सुरु आहे. ज्या-ज्या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य सरकार जाहीर करेल तेथील कार्यालये कार्यन्वीत करण्यास जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक मान्यता देतील. तेव्हा त्या-त्या भागातील कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन कार्यान्वीत करण्याबाबतचे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी दिले आहेत.

याशिवाय राज्य सरकारने कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणची वाईन शॉप, इतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. वास्तविक राज्यातील एकूण महसुला पैकी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी द्वारे 12 टक्के महसूल जमा होतो. तर, मद्य विक्रीतून 11 टक्के महसूल जमा होतो. लॉकडाउनमुळे दुय्यम निबंधक कार्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातील खरेदी खते, इतर गरजेचे दस्तऐवजांची नोंदणी ठप्प आहे. त्यामुळे सामान्य जनतेची अडचण होत आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर, काही मोजके तालुके वगळता इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झालेला नाही अथवा नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी अडवणूक लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालये व्यापक जनहित विचारात घेऊन तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती काकडे यांनी केली आहे.  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाबाबत ऑरेंज झोनमध्ये आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा मावळ तालुका कोरोना संसर्गापासून सुरक्षीत आहे. यामुळे परिसरातील उद्योग व्यवसाय, औद्योगिक कारखाने सुरु झाले आहेत. एकंदर राज्यावर ओढावत असलेल्या आर्थिक संकटाचा विचार करता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयेही त्वरित कार्यान्वित करावीत, अशी विनंती काकडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.