Talegaon Dabhade: घरांबरोबरच माणसंही उभी करणारा ‘दादा’ माणूस – अजितदादा भालेराव

एमपीसी न्यूज – नाना भालेराव कॉलनी, वतननगर, आनंदनगर, पंचवटी कॉलनी, वनश्री नगर, स्वराजनगरी, साई रेसिडेन्सी, मावळ लँड, लेक कॅसल ही नावं वाचली की तळेगाव दाभाडे शहरातील खूप मोठ्या भागाचा फेरफटका मारल्यासारखं वाटतं. या सर्व कॉलनी, गृहप्रकल्प उभारण्यात सिंहाचा वाटा असणारे नामवंत बांधकाम व्यावसायिक अजित तथा दादा वामनराव भालेराव हे आता आपल्यात राहिले नसले तरी तळेगावला त्यांनी दिलेल्या या योगदानामुळे ते कायम तळेगावकरांच्या स्मरणात राहतील, यात शंकाच नाही. केवळ घरे उभारण्याबरोबरच अजितदादांनी तळेगावात कित्येक माणसांना मदतीचा हात देऊन उभं केलं आहे, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. त्याचं कारण म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा दादांचा स्वभाव!

अजित भालेराव यांचे गेल्या बुधवारी (चार मार्च)  सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती, मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठीमागे पत्नी अर्चना, बंधू संजय भालेराव व बिपिन भालेराव तसेच रोहन व केतन हे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

अजित भालेराव यांच्या कुटुंबाने अनेक महत्त्वाचे गृहप्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून तळेगावच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. पुणे शहरातही सध्या त्यांचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. तळेगावच्या चांगल्या हवेमुळे मुंबईकरांना तळेगावचे विशेष आकर्षण आहे. या मुंबईकरांच्या पसंतीला पडतील आणि तळेगावचे निसर्गसौंदर्य अबाधित राहील, अशा पद्धतीने अजित भालेराव यांनी अत्यंत रेखीव व सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा कॉलनी आणि गृहप्रकल्प विकसित केले.

अजित भालेराव डबल ग्रॅज्युएट होते. 1970 मध्ये वडील नानासाहेब भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आणि त्यांनी बरेचसे प्रकल्प पूर्ण केले नंतर 1975 साली कमाल नागरी जमीन धारणा कायद्यामुळे (यूएलसी) भालेराव कुटुंबाला मोठ्या मानसिक आणि आर्थिक परिणामांना समोर जावे लागले. त्या आव्हानात्मक परिस्थितीतही अजित भालेराव यांनी कुटुंबाला शून्यातून उभारी देऊन पुन्हा नावारूपाला आणले.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अजित भालेराव यांच्या कुटुंबाने तळेगावच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बालविकास शाळेस शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली त्यांची जागा दान केली तसेच कलेच्या क्षेत्रात देखील त्यांचे योगदान मोठे होते.  या शाळेच्या आवारात त्यांनी नानासाहेब भालेराव कला मंदिर मोफत बांधून दिले. त्याचा शहरातील सांस्कृतिक चळवळीस आजही मोठा हातभार लागत आहे. अनेक कला संस्था व कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दादांनी सांस्कृतिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले.  बालविकास ही इंग्रजी माध्यमाची शाळा चालविणाऱ्या स्नेहवर्धक मंडळाच्या कार्यकारिणीवर ते कायमस्वरूपी सदस्य होते तसेच जाणीव संस्था व सरस्वती विद्या मंदिराच्या संचालक मंडळावरही अजित भालेराव यांनी काम केले. या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठा हातभार होता, तो सर्वांच्या कायम स्मरणात राहील.

दादा अत्यंत शिस्तप्रिय होते. नेमकेपणाने काम करण्याबरोबर त्यांचा भर असायचा. त्यात बरोबर हे खूप हळव्या मनाचे देखील होते. गरजूंच्या मदतीला धावून जाणे त्यांना आवडत असे. त्यांनी बऱ्याच कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून यशस्वीपणे पार पाडली. अलिकडेच एका कामगाराच्या नातीला कर्करोगावरील उपचारांसाठी देखील त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती, मात्र केलेल्या कामाचा, दिलेल्या दानाचा कोठेही गाजावाजा न करण्याचा त्यांचा स्वभाव होता.

त्यांना वाचन, इलेक्ट्रॉनिक्स, शेती, बांधकाम यात विशेष रुची असणाऱ्या दादांना माणसं जोडण्याचा विलक्षण छंद होता. घरांबरोबरच माणसंही उभी करणाऱ्या या ‘दादा’ माणसाला ‘एमपीसी न्यूज’ची भावपूर्ण श्रद्धांजली!

HB_POST_END_FTR-A2
You might also like