Talegaon Dabhade : त्या’ सहा मिनिटांत झाली ‘बारामती’च्या संभाव्य निकालावर चर्चा !

अजितदादा व बाळा भेगडे या दोघांनीही केला विजयाचा दावा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या सोमवारी मावळ तालुक्यातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात झालेल्या सहा मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे गूढ उलगडले आहे. दोघांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य निकालावर चर्चा झाल्याचे आमदार भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना स्पष्ट केले व तालुक्यात सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्ण विराम दिला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराची धामधूम सुरू असतानाच शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पवार व भेगडे हे तिघे योगायोगाने एका व्यासपीठावर आले. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे मावळातून निवडणूक लढवीत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारणे यांच्याशी काहीही न बोलता, आमदार भेगडे यांच्याशी सहा मिनिटे गप्पा मारल्या. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरून तालुक्यात अनेक राजकीय तर्क-वितर्क लढविले गेले. सोशल मीडियावर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘आपलं ठरलं’ अशा अशयाच्या पोस्ट व्हायरल केल्या. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने बाळा भेगडे यांच्याशी संपर्क साधून त्यांची अजितदादांशी नेमकी या चर्चा झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही पूर्णवेळ बारामती मतदारसंघातील लढतीबाबत बोललो, असे भेगडे यांनी स्पष्ट केले. तुम्ही बारामतीच्या निकालाबाबत एवढं आत्मविश्वासपूर्वक कसं बोलू शकता, असा विषय छेडल्यानंतर आम्ही त्या विषयावरच पुढे बोलत होतो. अजितदादांनी त्यांची विजयाची गणिते मांडली व सुप्रियाताईच विजयी होतील, असा दावा केला. यावेळी भाजपने बारामतीत जास्त जोर लावला होता, असा शेराही अजितदादांनी मारला. त्यावर यावेळी बारामतीचा निकाल वेगळा लागलेला दिसेल, असा विश्वास आपण व्यक्त केल्याचे भेगडे यांनी सांगितले. विषय राजकीय असला तरी अत्यंत हसत-खेळत आमची चर्चा झाली. मावळच्या लढतीबाबत मात्र एका शब्दानेही त्यावेळी आम्ही बोललो नाही, असे भेगडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.