Talegaon Dabhade: कोरोना संशयित आढळल्यानंतर संपूर्ण तळेगाव परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित

कोरोना निर्मूलनासाठी तळेगावात 'बारामती पॅटर्न' राबवा - आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – कोरोना संशयित आढळल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत झालेल्या तातडीच्या बैठकीत संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर व परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी दुपारी त्याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार तळेगाव नगर परिषदेचे क्षेत्र व लगतचा भाग पुढील 14 दिवसांसाठी अतिसंक्रमणशील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना निर्मूलनासाठी तळेगावात ‘बारामती पॅटर्न’ राबविण्यात यावा, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला केली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे, तळेगाव स्टेशन, वराळे, माळवाडी, कातवी, आंबी, वारंगवाडी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प तसेच वडगावचा काही भाग 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमाटणे, इंदोरी, परंदवडी आदी ठिकाणी बफर झोन जाहीर करण्यात आला आहे.

आजपर्यंत सुरक्षित असलेल्या मावळ तालुक्यात अखेर कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेची खासगी रुग्णालयात केलेली कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या परिचारिकेला कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित कोरोना संशयित महिलेला पुण्यात शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून शासकीय प्रयोगशाळेत पुन्हा त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्या चाचणीच्या अहवालानंतरच त्या परिचारिका कोरोना पॉझिटीव्ह आहेत अथवा नाहीत, हे स्पष्ट होईल, असे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

तळेगावात ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्वरीत तपासणी करुन संबंधित संस्थांनी सोय करावी अन्यथा इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करणार असल्याचे बर्गे म्हणाले. सर्व प्रवेशद्वारांवर तपासणी कडक करुन कंटेनमेंट झोनमधील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करणार असून फक्त भाजीपाला, किराणा, दूध आणि मेडिकल दुकाने आदी अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

नगरपरिषदेत झालेल्या आमदार सुनील शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.चंद्रकांत लोहारे,गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड आदी उपस्थित होते.

तळेगावात ये-जा करण्यासाठी कडक निर्बंध घालण्याची सूचना आमदार शेळके यांनी केली. तळेगावातील कोरोना निर्मूलनासाठी ‘बारामती पॅटर्न’ राबवावा, असेही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.