Talegaon News : ‘अत्यावश्यक सेवेप्रमाणे अन्य व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी परवानगी द्या’

तळेगावातील व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन बाबत आदेश दिले आहे. त्यानुसार तळेगाव नगरपरिषद आणि तळेगाव पोलिसांनी काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात तसेच अत्यावश्यक सेवेप्रमाणे व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांना निवेदन दिले.

जिल्हाधिका-यांनी कोविड 19 ची संसर्ग साखळी तोडण्यासाठी “ब्रेक दि चेन” या प्रतिबंधात्मक आदेशान्वये तळेगाव येथे पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने एकत्रीत व्यापा-यांना सूचना करून दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ज्या व्यापा-यांनी या आदेशाचे पालन केले नाही त्यांच्यावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने कपडे, भांडी व दैनंदिन वापराच्या वस्तूच्या दुकानदारांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. शासनाच्या अत्यावश्यक सेवांच्या शिवाय इतर दुकानदारांना नोकरांचे पगार, वीज बिल, दुकान भाडे आदि बाबींची पूर्तता दुकान बंद असतानाही करावी लागत आहे.

त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये चालू असलेल्या व्यवसायाप्रमाणे आमचे व्यवसाय चालविण्याची परवानगी देण्याची मागणी प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे व्यापारी वर्गाने निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी स्थानिक व्यापारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (दि. 6) दिवसभर तळेगाव शहरातील दुकाने बंद होती.

दरम्यान, शासनाच्या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे असे सांगत कोविड 19 ची संसर्ग साखळी तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी केले.

अत्यावश्यक सेवेतील व्यापा-यांच्या बरोबर इतर व्यावसायिकांना शासनाच्या नियमानुसार व्यवसाय करण्याची संधी मिळावी, असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.